साताऱ्याचे पालकमंत्री देसाई आंदोलन दडपत असल्याचा शेतकरी संघटनांचा आरोप

सातारा : ऊस दराबाबत सुरु असलेले आंदोलन दडपण्याचा आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. रविवारी कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यात विविध ठिकाणी ‘स्वाभिमानी’कडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीवर अद्याप तोडगा निघालेला नाही.

स्वाभिमानी संघटनेच्या मागणीनुसार ऊस दर जाहीर करण्यात येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात शेतकरी संघटनांनी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टायरमधील हवा सोडली आहे. मात्र, ऊस दरासाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेले आंदोलन दडपण्याचा आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश शेवाळे यांनी शंभूराज देसाई यांच्यावर आंदोलन दडपण्याचा गंभीर आरोप केला.

शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करण्यास सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवानंद पाटील, चंद्रकांत यादव, उत्तम साळुंखे, बापूराव साळुंखे, सतीश यादव यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कार्यकर्त्यांकडून कराड – चांदोली मार्गावर पाचवड फाटा (ता.कराड) येथे रास्ता रोको करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here