अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची १९० कोटी रुपयांची एफआरपी थकीत

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात १ कोटी २४ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले. जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांनी एकूण १ कोटी २० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. मात्र हंगाम संपून जवळपास दोन महिने उलटले तरी अद्याप १७ कारखान्यांनी १९० कोटी रुपयांची एफआरपी (उसाचा योग्य आणि लाभदायी दर) दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याप्रश्नी आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, अहमदनगर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी दिली आहे. तर १७ कारखान्यांनी पूर्ण पैसे दिलेले नाहीत. याबाबत साखर सहसंचालक कार्यालयाने साखर आयुक्त कार्यालयास अहवाल सादर केला आहे. त्यानंतर साखर आयुक्त कार्यालयाने कारखान्यांना आरआरसीच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रादेशिक साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी सांगितले की, थकबाकीदार कारखान्यांना नोटीसा बजावल्या आहेत.

दरम्यान, आम आदमी पक्षाने शेतकऱ्यांच्या थकीत बिलांचा मुद्दा उपस्थित केला आहे. साखर कारखान्यांनी ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना सर्व पैसे न दिल्यास प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here