शेतकऱ्यांना ९५ टक्के ऊस बिले अदा: केंद्र सरकार

117

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी ९५ टक्के ऊस बिले अदा केली आहेत. सध्याची थकबाकी ५,००० कोटी रुपयांहून कमी असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. केंद्र सरकारने संसदेत ही माहिती दिली. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ८८,४३६ कोटी रुपयांची ऊस बिले अदा केली आहेत. सप्टेंबरअखेर संपलेल्या २०२०-२१ या हंगामातील ऊसाचे अद्याप ४,४४५ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात अन्न आणि ग्राहक व्यवहार खात्याच्या राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी ही माहिती दिली. ऑक्टोबर २०२०-सप्टेंबर २०२१ या हंगामात ६ डिसेंबर २०२१ अखेर ४,४४५ कोटी रुपयांची ऊस थकबाकी शिल्लक राहिल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हंगाम २०२०-२१ मध्ये एकूण ९२,८८१ कोटी रुपये शेतकऱ्यांना देय होते. त्यापैकी ८८,४३६ कोटी रुपये देण्यात आले आहेत. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना सातत्याने पैसे दिले आहेत. २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ या हंगामात कारखान्यांनी शेतकऱ्यांना अनुक्रमे ५५,३४० कोटी, ८३६२९ कोटी, ८६,६१७ कोटी, ७५९०७ कोटी आणि ९२,८८१ कोटी रुपये देणे अपेक्षित होते. तर ६ डिसेंबरपर्यंत अनुक्रमे ६५ कोटी, १३५ कोटी, ३६५ कोटी, १३० कोटी आणि ४,४४५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देण्यात मोठा उशीर झालेला नाही असे मंत्री साध्वी ज्योती यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात सरासरी ९८ टक्के ऊस बिले अदा झाली आहेत, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थकीत ऊस बिलांच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here