उसाच्या नव्या फुले १५०१२ वाणाला शेतकऱ्यांची पसंती

पुणे : बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील शेतकरी यतीन घुले यांना २६५ व ९४००८ या दोन जातींपासून तयार केलेले फुले १५०१२ हे संकर फुलविण्यास यश आले आहे. टनेजसह साखरेचे उत्पादन वाढविणाऱ्या या बेण्याला मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली आहे. आपल्या तेरा गुंठे क्षेत्रात घुले यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. गेल्यावर्षी त्यांना छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडून बेणेमळ्यासाठी १५०१२ या वाणाची मोळी मिळाली. त्यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातून आणखी १३ मोळ्या आणून या उसाची लागवड केली होती.

पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने फुले २६५ आणि को ९४००८ या वाणांच्या संकरातून हे नवे बेणे तयार केले आहे. २०१२ मध्ये याचा पहिला संकर करण्यात आला. २०१४ पासून २०२१ पर्यंत तीन लागवड हंगामात चाचण्या घेतल्या. देशपातळीवर नऊ राज्यात या वाणाचा अभ्यास केला गेला. या अहवालाच्या आधारे कोकण कृषी विद्यापीठात झालेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत फुले ऊस १५०१२ या वाणाची रश्‍चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. क्षारयुक्त चोपण जमिनींसाठी हे १५०१२ वाण अतिशय उपयुक्त आहे. आडसाली हंगामात हेक्‍टरी १८३ टन, पूर्व हंगामात हेक्‍टरी १६७ तर सुरू हंगामामध्ये हेक्टरी १३७ टनापर्यंत उत्पादन मिळू शकते. खोडव्यामध्येसुद्धा हेक्टरी १३० टनापर्यंत उत्पन्न निघू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here