संगरुर : पंजाबमध्ये ऊस बिलांचा मुद्दा अधिक वादग्रस्त बनत चालला आहे, त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. याबाबत ‘द ट्रिब्यून’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, खासगी साखर कारखान्याने ऊसाची थकीत बिले द्यावीत अशी मागणी करत ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या काही सदस्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या धुरी येथील कार्यालयातील पाण्याच्या टाकीवर गेल्या तीन दिवसांपासून (गुरुवारी) आंदोलन सुरू केले आहे. या तीन आंदोलकांपैकी एकाची प्रकृती खालावल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
समितीचे अध्यक्ष हरजितसिंग बुघरा यांनी स्थानिक साखर कारखान्याकडे १४ कोटी रुपये थकीत असून, कृषी विभागाचे अधिकारी या कारखान्यांवर आवश्यक ती कारवाई करत नसल्याचा आरोप केला. जर अधिकारी ऊस बिले मिळवून देण्यात अपयशी ठरले तर आम्ही संगरूर लोकसभा पोटनिवडणुकीत आपच्या उमेदवाराला विरोध करू, असे आंदोलकांनी सांगितले.