धाराशिव : ऊस उत्पादकांनी ऊस तोडीस घाई करू नये. शेतकऱ्यांनी विचारपूर्वक कारखाना निवडून ऊस पुरवठा करावा. कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांनी केले. केशेगाव (ता. धाराशिव) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष अरविंद गोरे यांचे अध्यक्षतेखाली रविवारी (२४ सप्टेंबर) कारखाना कार्यस्थळावर झाली.
यावेळी अध्यक्ष गोरे म्हणाले की, कारखान्यामार्फत खोडवा व्यवस्थापन कार्यशाळा आयोजीत करण्यात येणार आहे. दुष्काळ परिस्थिती असल्याने ऊस व पाणी टंचाई जाणवते. परंतु आपण वेळोवेळी या संकटावर मात करत आलो आहोत. उसामध्ये ७० टक्के पाणी असते. याचा विचार करून कारखान्याने उसातील पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी यंत्रसामग्री बसवलेली आहे. उसातील ७० टक्के निघणारे पाणी हे को-जन व डिस्टिलरी प्रकल्पासाठी वापरण्यात येते. या हंगामात बॉयलिंग हाऊसमधील गटरमधून वाया जाणाऱ्या पाण्याचे फिल्ट्रेशन करुन व त्याचे तापमान वाढवून पुन्हा इम्बिबीशनसाठी वापर करणार आहे.
अध्यक्ष गोरे म्हणाले की, आसवनी प्रकल्पातील पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सीपीयू प्रकल्प उभा केला आहे. त्यातून निघणारे ६० टक्के पाणी कारखाना प्रोसेससाठी तर ४० टक्के पाणी शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे शून्य प्रदूषण गाठून झिरो इंटेक व झिरो डिस्चार्ज संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. साखरेच्या दरातील चढ-उतारामुळे, साखर निर्यात बंदीमुळे एफआरपीप्रमाणे ऊस दर देण्यास कारखान्यांना अडचणी आहेत. गुळ पावडर कारखान्यांची वाढलेली संख्या, कारखान्यांनी वाढती गाळप क्षमता पाहता कारखाने जेमतेम १०० दिवस चालतील, असेही त्यानी सांगितले. कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद व महिला सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. संचालक अॅड. निलेश पाटील यांनी आभार मानले.