कोल्हापूर : गेल्या दोन वर्षात साखरेला राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळत आहे. इथेनॉल, वीज आणि अन्य उपपदार्थांच्या निर्मितीतूनही साखर कारखाने नफा कमवत आहेत. शेतकऱ्यांना कारखान्यांच्या नफ्यातील हिस्सा मिळाला पाहिजे, अशी मागणी साखर आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे ‘आंदोलन अंकुश’च्या शिष्टमंडळाने केली.
साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महागाईमुळे उसाचा उत्पादन खर्च मोठया प्रमाणात वाढला आहे. ऊस शेती करणे शेतकऱ्यांना जिकीरीचे बनत चालले आहे. दुसरीकडे शासनाने इथेनॉलला चालना देण्याचे धोरण घेतल्यापासून सर्वच साखर कारखान्यांना मळी विक्रीतून व जे कारखाने इथेनॉल निर्माण करतात त्यांना अतिरिक्त फायदा होत आहे. त्या फायद्यातील वाटा शेतकऱ्यांना मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सांगितले.
राज्यातील सर्वच शासकीय लेखा परीक्षकांना तोडणी वाहतुकीच्या खर्चाचे शासनाच्या नियमाप्रमाणे पुन्हा प्रमाणीकरण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी साखर आयुक्ताना केल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले. यावेळी दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, धनाजी माने, आप्पा कदम, प्रमोद बाबर, बाळासाहेब भोगावे, सुनील बाबर, मलगोंडा चौगुले, आनंदा भातामारे, महेश जाधव, संभाजी निंबाळकर, पोपट संकपाळ, महादेव काळे आदी उपस्थित होते.