‘शाहू’च्या योजनांचा ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे

कोल्हापूर : उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवल्याशिवाय ऊस शेती किफायतशीर होणार नाही. त्यासाठी शाहू साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. ‘शाहू’च्या ऊस विकास योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा व राज्य साखर संघाच्या संचालिका सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले. मुरगूड येथे कारखान्यामार्फत आयोजित ऊस पीक परिसंवादात त्या बोलत होत्या. चर्चासत्रास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘व्हीएसआय’च्या शास्त्रज्ञ डॉ. प्रीती देशमुख म्हणाल्या की, रासायनिक खते एकाचवेळी भरमसाट न देत तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार विभागून मातीआड करून द्यावीत. जमिनीचे सेंद्रिय कर्ब सुधारल्याशिवाय उसाचे अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. त्यासाठी हिरवळीच्या खते, शेणखत, कंपोस्ट खत व शाहू समृद्ध सेंद्रिय खतांचा नियमितपणे वापर करावा. कीटकशास्त्रज्ञ डॉ. गणेश‍ कोटीगरे यांनी मार्गदर्शन केले. अनंत फर्नांडिस, अमर चौगले, सूरज एकल, रामभव खराडे जयवंत पाटील, सरपंच रेखा माळी, सुहासिनी खराडे आदी उपस्थित होते. शेती अधिकारी रमेश गंगाई यांनी स्वागत केले. ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here