शेतकऱ्यांनी एकसंघ होऊन कारखानदारांचा हिशेब चुकता केला पाहिजे : माजी खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर : आम्ही चळवळीच्या माध्यमातून जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून प्रती टन १०० रुपये जादा घेतले आहेत यावर समाधानी आहोत, असे नाही, उर्वरित पैसे घेण्यासाठी कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कुरुंदवाडमध्ये ओंकार चौकात आयोजित आभार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोपाळ चव्हाण होते. शेतकऱ्यांनीही एकसंघ होऊन या कारखानदारांचा हिशेब चुकता केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, रावसाहेब पाटील, सावकार मदनाईक, आण्णासाहेब जोंग, सचिन शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी शेट्टी म्हणाले की, जादा ऊस दर द्यायला लागू नये यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि ‘दत्त’चे चेअरमन गणपतराव पाटील हे राजकीय हाडवैर विसरून एकत्र येतात. तशीच एकी शेतकऱ्यांनी दाखवण्याची गरज आहे.

सावकर मादनाईक यांनी कारखानदारांनी शेतकऱ्यांची चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी संघटनेच्या आंदोलनावर विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानले. शिवाजी रोडे यांनी स्वागत केले. अविनाश गुदले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, रावसाहेब पाटील, सचिन शिंदे, गोपाळ चव्हाण आदींची भाषणे झाली. सुवर्णा अपराज, अॅड. जयकुमार पोमाजे, शैलेश आडके, बंडू उमडाळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here