मंड्या : कर्नाटक सरकारने मंड्या ऊस संशोधन केंद्र आणि बेंगळुरू मुख्यालय आयुक्त कार्यालय बेळगाव येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे .
Thehansindia.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सरकारच्या या निर्णयामुळे मंड्या येथील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राज्य सरकारच्या अधिपत्याखाली असलेला मंड्या साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. शेतकरी हा कारखाना सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवत आहेत. अशा वेळी सरकारने ऊस संशोधन केंद्र बेळगावला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असल्याने मंड्या जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंधरा वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या ऊस संशोधन केंद्राने आतापर्यंत उसाच्या १५ पेक्षा अधिक नव्या जाती प्रसारित केल्या आहेत. याशिवाय हे संशोधन केंद्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप लाभदायक ठरले आहे. मंड्या रयत हितरक्षण समितीने सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.