रुडकी : ऊस दर जाहीर करण्यास सरकारकडून उशीर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडून ऊस दर जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. तर शेतकरी संघटनांनी यावेळी ऊस दर किमान ४५० रुपये प्रती क्विंटल जाहीर करावा अशी मगाणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात ९४ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस पिक घेतले जाते. हे पिक जिल्ह्याचे मुख्य पिक आहे. शेतकरी जिल्ह्यातील इक्बालपूर, लिब्बरहेडी आणि लक्सर साखर कारखान्यासह डेहराडून जिल्ह्यातील डोईवाला साखर कारखान्यालाही ऊस पुरवठा करतात. जवळपास दोन कोटी क्विटंल उसाचे गाळप केले जाते. गेल्या चार वर्षात सरकारने ऊस दरात वाढ केलेली नाही. शेतकऱ्यांना ऊसासाठी ३१७ आणि ३२७ रुपये प्रती क्विंटल असा दर दिला जातो. यावेळी शेतकरी संघटनांनी उसाच्या दरप्रश्नी सरकारवर दबाव वाढवला आहे. शेतकरी राजकारणाशी संलग्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत उत्तराखंडच्या ऊस विकास मंत्र्यांना निवेदनही दिले आहे. दुसरीकडे सरकारवर शेतकरी संघटनांनी दबाव वाढवला असून यंदा विधानसभेच्या निवडणुकाही होत आहेत. त्यामुळे दरवाढ होईल अशी अपेक्षा आहे. याबाबत ऊस विकास मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांनी यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिले जाईल असे सांगितले आहे. समितीच्या अहवालानंतर सरकार ऊस दर निश्चित करणार आहे.