सांगली : येरळा नदीकाठच्या वसगडे (ता. पलूस) गावातील क्षारपड जमिनीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने सूरज पवार यांनी सच्छिद्र निचरा प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यांनी या तंत्रज्ञानाचा सांगोपांग अभ्यास केला. गावात यापूर्वी, सुमारे बारा वर्षापूर्वी बाळासाहेब सावंत व उदय कोकाटे यांनी ही पद्धत अवलंबली होती. त्याचा सखोल अभ्यास करून आपली शेती क्षारपड समस्येतून बाहेर काढायचे असा निर्धार पवार कुटूंबियांनी केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
अॅग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेताच्या जमिनी सखल भागात असल्याने शेतांमध्ये पाणी साचून राहण्यास सुरवात झाली. त्यामुळे गावातील रामचंद्र, मधूकर व सुधाकर या पवार कुटुंबाच्या १४ एकर शेतीला फटका बसला. सुधाकर यांचे चिरंजीव सूरज यांनी वडिलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती सुरू केली. चुलतबंधू नितीन, सचिन तसेच बंधू प्रमोद, अमोल, संग्राम, संदीप, संजय यांची शेतीत मदत घेतली. त्या शेतीत सुधारणेसाठी तंत्रज्ञानाने मार्ग दाखवला.
कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कृषी संशोधन केंद्रात जाऊन जलसिंचन व निचरा अभियांत्रिकीचे सहायक प्राध्यापक एस. डी. राठोड यांची भेट घेतली. त्यानुसार २०१६ मध्ये १२ एकरांवर सच्छिद्र निचरा प्रणाली यंत्रणा बसवली. या प्रणालीसाठी एकरी खर्च येतो सुमारे ७० हजार रुपये. यातील केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा प्रत्येकी ४० टक्के व शेतकरी हिस्सा २० टक्के वाट्याला आला. तंत्रज्ञान वापराचा परिणाम एक वर्ष ते तीन वर्षात दिसले. गरजेनुसार ठिबक सिंचनाचा वापर सुरू झाला. ऊस पीक व्यवस्थापनातही बदल केला. या व्यवस्थापनामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यासही मदत झाली आहे.