साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात, ऊस बिले नमिळाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त

पुणे : जिल्ह्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, विघ्नहर सहकारी साखर कारखाना, घोडगंगा असे ठरावीक सहकारी साखर कारखाने एप्रिल महिन्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. कारण या कारखान्यांच्या परिसरात अद्यापही ऊस गाळपासाठी उपलब्ध असल्याने ऊसाची कमतरता भासणार नाही; परंतु जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांचे चित्र पाहता अनेक कारखाने मार्च महिन्यातच बंद होण्याची शक्यता आहे. असे असले तरी कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी नुसार ऊस बिले अजूनही दिलेली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

दरम्यान जे साखर कारखाने बंद होण्याच्या अवस्थेत आहेत, अशा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना एफआरपीनुसार अद्यापही ऊसाची बिले अदा केलेली नाहीत, ज्या शेतकऱ्यांचे जीवन ऊस पिकावर अवलंबून आहे. अशा शेतकऱ्यांना ऊस बिलाची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्यात ऊसदराचे तुकडे पाडण्याचा निर्णय साखर कारखान्यांनी घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. शेतकऱ्यांकडून संमतीपत्रावर सह्या करून घेतल्या जात असल्याचेही समजते.

काही साखर कारखान्याकडून एक बिल देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु आजअखेर बिले देण्यासाठी बहुतांशी साखर कारखान्यांनी ठोस पावले उचलली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

कारखान्यांचे धुराडे विझण्याच्या मार्गावर आले असता अजूनही शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम हाती पडली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संसाराची घडी विस्कटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

जिल्ह्यातील बहुचर्चित आणि चांगले व्यवस्थापन असलेल्या भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे बाळासाहेब बेंडे यांनी काही दिवसापूर्वीच स्वीकारली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिलाची प्रतिक्षा करावी लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ४ खाजगी आणि १३ सहकारी साखर कारखाने आहेत. खाजगी कारखान्यांनी जाहीरपणे दराची घोषणा केली आहे. मात्र इतर कोणत्याही कारखान्यांनी दर जाहीर न करताच गाळप सुरु केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here