म्हैसूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत KRRS (Karnataka Rajya Raitha Sangha) आज बेंगळुरूमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप KRRS चे अध्यक्ष बडगलापुरा नागेंद्र यांनी केला.
त्यांनी सांगितले की, ऊसाला प्रतीटन ४५०० रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. याशिवाय साखर कारखान्यांकडून उशीरा मिळणारी ऊस बिले आदी समस्या सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. नागेंद्र यांनी दावा केला की, साखर कारखाने केंद्र सरकारकडून निश्चित केलेल्या ऊस दरापेक्षा कमी पैसे शेतकऱ्यांना देत आहेत. शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की, शेतकरी ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता KSR बेंगळुरू रेल्वे स्टेशन (मॅजेस्टिक) येथे जमतील. तेथून फेरी काढून ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत जातील. पत्रकार परिषदेला होसुर कुमार, पी. मारंकैया, होसकोटे बसवराज, सरगुर नटराज, प्रभाकर आनंदुर, मंदाकल्ली महेश आणि इतर उपस्थित होते.