विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे अंतिम ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

सोलापूर : निमगाव येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडे २०२२ -२३ हंगामात गळितास आलेल्या उसाला प्रतिटन १५० रुपयांचे अंतिम बिल शुक्रवारी (ता. १) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आ. शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर युनिट नंबर एक व करकंब युनिट नंबर दोनमध्ये मागील हंगामात गाळप झालेल्या २३ लाख ९१ हजार टन उसाला प्रतिटन २५५० रुपये दर दिलेला आहे व आता प्रतिटन १५० रुपये अंतिम बिल हप्ता देण्यात आला आहे.

कारखान्याची एफआरपी रक्कम प्रति टन २६५० रुपये आहे. परंतु एफआरपीपेक्षा ५० रुपये प्रति टन जादा दर शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. मागील हंगामात अखेरच्या महिन्यात १६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत गळितास आलेल्या उसाला ७५ रुपये प्रति टन जादा, तर एक मार्चपासून हंगाम संपेपर्यंत आलेल्या उसाला प्रति टन १५० रुपये ज्यादा दर दिलेला आहे, असेही आ. शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना प्रतिटन २७७५ ते २८५० रुपये दर मिळाला आहे. या वेळी उपाध्यक्ष वामनभाऊ उबाळे, रमेश पाटील, सुहास पाटील जामगावकर, तुकाराम ढवळे, शंभुराजे मोरे, शिवाजीराव पाटील, प्रमोद कुटे, मोडनिंबचे दत्तात्रय सुर्वे, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here