अखेर तोडगा निघाला…सांगलीत साखर कारखानदार पहिली उचल ३१७५ रुपये देणार

सांगली : मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या ऊसदर आंदोलनावर अखेर तोडगा निघाला. प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दरप्रश्नी जिल्हा प्रशासन, साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत विनाकपात सरसकट पहिली उचल ३,१७५ रुपये देण्यावर कारखानदारांनी सहमती दर्शवली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही हा दर मान्य केला. आ. अरुण लाड, पोलिस अधीक्षक बसवराज तेली, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा आदींसह कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बुधवारची बैठक राजारामबापू साखर कारखान्याचे ३ युनिट, क्रांती, सोनहिरा, विश्वास आणि हुतात्मा कारखान्यांच्या ऊसदराबाबत झाली. बैठकीवेळी स्वाभिमानी ३२०० रुपये दरावर ठाम होती. मात्र कारखानदार ३१०० रुपयांच्या पुढे जात नव्हते, त्यामुळे बैठक निष्फळ ठरण्याची शक्यता होती. कारखानदारांनी आणखी वेळ मागितली. मात्र, स्वाभिमानीचे प्रतिनिधी बैठकीतून बाहेर पडले. पुन्हा अर्ध्या तासानंतर झालेल्या बैठकीत कारखानदारांनी ३,१७५ रुपये दरावर सहमती दाखवली. संघटनेनेही हा दर मान्य केला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघाला.

बैठकीत सात कारखान्यांच्या दराबाबतचा प्रश्न होता. उर्वरित कारखाने क्षमतेनुसार चांगला दर देतील असे प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष – महेश खराडे यांनी सांगितले की, ऊसदराच्या बैठकीत कारखानदारांनी विनाकपात सरसकट एकरकमी पहिली उचल ३१७५ रुपये देण्यावर सहमती दर्शवली. हा दर आम्ही मान्य केला. मात्र, दराबाबत आम्ही शंभर टक्के सहमत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here