सोलापूर : अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात गुरुवारी, दि. १६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे जमिनीवरील वाळलेल्या गवताला आग लागली. या आगीतच कारखाना कार्यस्थळावरच्या वेस्टेज स्टोरेजच्या प्लास्टिक वस्तूसह जुने टायर, प्लास्टिक पोती पिशव्यांनी पेट घेतल्याने आगीचा डोंब उसळला. बघता बघता वेस्ट स्टोरेजच्या सर्व वस्तूंना भीषण आग लागली.
शंकरनगर येथील या कारखान्याच्या वेस्टेज स्टोअरेजला शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. सहकार महर्षी, शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर व पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूरच्या अग्निशमन दलाच्या पथकांना बोलावण्यात आले. या बंबांच्या अथक परिश्रमानंतर सायंकाळी सात वाजता आग आटोक्यात आली. आगीत किती नुकसान झाले याचा अंदाज घेण्याचे काम कारखान्याच्या वतीने सुरू आहे. कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील व कामगारांनी मिळून आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले.