वर्धन ॲग्रोकडून पहिली उचल २९०० रुपये जाहीर

सातारा : वर्धन ॲग्रोकडून आगामी हंगामासाठी पहिली उचल प्रति टन २९०० रुपये जाहीर करण्यात आली. घाटमाथा त्रिमली (ता. खटाव) येथील वर्धन ॲग्रो कारखाना व्यवस्थापन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत पहिली उचल जाहीर करण्यात आली व अंतिम दर जयसिंगपूर येथील ऊस परिषदेमध्ये जो ठरविण्यात येईल, त्यानुसार दर दिला जाईल असे यावेळी जाहीर करण्यात आले.

वर्धन कारखान्याने दर जाहीर न करता कारखाना सुरु केल्याने या दराचा तोडगा काढण्यासाठी ही बैठक कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ‘वर्धन’चे चेअरमन धैर्यशील कदम, कार्यकारी संचालक विक्रमशील कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, राज्य कार्यकारणी सदस्य सूर्यकांत भुजबळ, जिल्हाध्यक्ष श्रीकांत लावंड, युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, तालुका अध्यक्ष दत्तात्रय घार्गे, खटाव माण संपर्कप्रमुख शरद खाडे, रामदास शिंदे, संतोष तुपे, रवींद्र पाटील, अविनाश बागल, बंडा पाटील, पांडुरंग सुर्यवंशी, संघटनेचे पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी कारखाना व्यवस्थापनाकडे प्रति टन साडेतीन हजार रुपये दराची मागणी ठेवली. त्यावर चेअरमन धैर्यशील कदम यांनी कारखान्याचा आर्थिक लेखाजोखा मांडला. कदम यांनी उसाला अन्य साखर कारखान्याच्या तुलनेत योग्य दर देण्याची ग्वाही दिली. कदम म्हणाले की, महाराष्ट्रातील हा पहिला कारखाना आहे की, ज्याचे वजनकाटे डिजिटल आहेत. शेतकऱ्यांना कारखान्याकडून ऊस क्षेत्र वाढावे म्हणून बिनव्याजी भांडवल देण्याचे नियोजन सुरु आहे.आता २९०० रुपये पहिली उचल देणार असून जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीने दर देणार आहे तसेच जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत ठरेल तेवढा दर देणार असल्याचेही कदम यांनी बैठकीत सांगितले. डिजिटल वजन काटा बसविल्याने संघटनेच्या वतीने धैर्यशील कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय घार्गे यांनी प्रास्ताविक तर तानाजी देशमुख यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here