महापुराच्या तडाख्यानंतर, ऊस गाळप हंगामापुढे प्रश्नचिन्ह?

कोल्हापूर : चीनी मंडी

कोल्हापूर, सांगलीला बसलेल्या महापुराच्या तडाख्यामळे जवळपास दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्राबरोबर कृषी, दुग्ध उत्पादन आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला महापुराचा मोठा दणका बसला आहे. महापुरातील नुकसानीची निश्चित आकडेवारी पुराचे पाणी ओसरल्यानंतरच सांगता येईल, असे औद्योगिक क्षेत्रातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नदी काठच्या ऊस शेतीला मोठा फटका बसल्यामुळे आता आगामी ऊस गाळप हंगामापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ४५ साखर कारखाने आहेत. दोन्ही जिल्ह्यात मिळून अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस शेती होते. साखर कारखान्यांमध्ये जवळपास २ हजार १६१ लाख टन ऊस गाळप होतो. पण, महापुराच्या तडाख्याने साखर उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. महापुरात उभ्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पुढच्या हंगामासाठी तयार असलेला सगळा ऊस पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे आगामी हंगामात ऊस कमी उपलब्ध होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही साखर कारखान्यांनी आगामी हंगामासाठी मराठवाड्यातील ऊस तोडणी मंजूरांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची उचल दिली आहे. त्या साखर कारखान्यांना हे नुकसान सहन करावे लागणार आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले, ‘ऊस पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक सहकारी साखऱ कारखाने यंदाच्या हंगामाच चालणार नाहीत.’

पश्चिम महाराष्ट्राला २००५नंतर पुन्हा एकदा महापुराचा तडाखा बसला आहे. सध्या पाच जिल्ह्यातील एकूण दोन लाखांहून अधिक नागरिक विस्थापित आहेत. आतापर्यंत २७ जणांना या पुराच्या पाण्यात प्राण गमवावे लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला असून, नागरिकांचे प्राण वाचवण्याला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पूग्रस्त भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यावर सरकारने भर दिला असून, औषधांचा पुरेसा साठा देण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास मुंबईहून वैद्यकीय कुमक पाठवण्यात येईल, अशी ग्वाही ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरलचे अधिकारी शिवाजी पाटील म्हणाले, ‘सांगली जिल्ह्याचे नुकसान ५ हजार कोटींच्या घरात असणार आहे. कदाचित त्यापेक्षाही जास्त नुकसान झाले असणार आहे. संततधार पावसानंतर धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे महाभयंकर पूरस्थितीती निर्माण झाली. सांगलीमध्ये औद्योगिक वसाहती थोड्या उंचीच्या ठिकाणी असल्या तरी नदी काठच्या गावांना खूप मोठा फटका बसला आहे. घरांचे, प्रापंचिक साहित्याचे, गाड्यांचे खूपमोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरलचे उपाध्यक्ष ललित गांधी म्हणाले, ‘कृषीक्षेत्राबरोबरच धान्या बाजारपेठ, किरकोळ बाजार, दागिन्यांचा बाजार येथे महापुराचा खूप मोठा फटका बसला आहे. नागरी वस्त्यांमध्ये आतोनात नुकसान झाले आहे. त्यात घरांचे, वाहनांची मोठी हानी झाली आहे. सरकारने तातडीने मदत जाहीर केली पाहिजेत तसेच पूरग्रस्त भागात यंत्रसामुग्रीच्या साह्याने स्वच्छता करून आवश्यक वैद्यकीत सेवा पुरवली पाहिजे.’

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here