आसाममधील पुराचा २२ लाख लोकांना फटका, सिलचरमध्ये स्थिती प्रचंड गंभीर

46

नवी दिल्ली : आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. ही स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. सोमवारी आणखी आठ लोकांना पुरामुळे जीव गमवावा लागला. आतापर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला आहे. आसामच्या डिझास्टर मॅनेजमेंट अॅथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार, कछार जिल्ह्यात पाच, कामरुप मेट्रो, मोरीगाव आणि नगावमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. तर कछार जिल्ह्यात एक व्यक्ती बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आसाममध्ये पुराचा फटका जवळपास २२ लाख लोकांना बसला आहे. गेल्या काही दिवसांत २८ जिल्ह्यांतील २२.२१ लाख लोकांवर याचा परिणाम दिसून आला होता. यादरम्यान, राज्यात किरकोळ बदल झाल्याचे दिसत आहे. पुराचा फटका बसलेल्यांची संख्या २२ जिल्ह्यांमध्ये २१.५२ लाख झाली आहे.

याबाबत मनीकंट्रोल डॉट कॉमवरील वृत्तानुसार, आसाममधील नगाव जिल्ह्यात पुराची स्थिती भयानक आहे. उपआयुक्त निसर्ग हिवारे यांनी पत्रकारांना सांगितले की, लोकांना मदतीची सामग्री दिली जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून आम्ही मदतीचे वाटप करीत आहोत. आणखी पाच दिवसांसाठीची तयारी केली आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश नद्यांचे पाणी कमी होत आहे. मात्र, नगावमधील कोपिली, कछापमधील बराक आणि करीमगंजमधील कुशियारा नदी आताही धोक्याच्या पातळीवरून वाहात आहे. सिलचरमध्ये स्थिती आजही गंभीर आहे. अनेक भाग पाण्यात बुडाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी दोनवेळा पूरग्रस्त भागाचा दौरा केला असून त्यांनी मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here