ब्रासीलिया : ब्राझीलमध्ये आलेल्या जोरदार पुरामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत २८० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सीएनएनने याबाबत सोमवारी गव्हर्नर रुई कोस्टा यांच्याकडील माहितीनुसार वृत्त दिले आहे. बाहिया प्रांतातील पुरामुळे ४० शहरांना फटका बसला आहे. ते म्हणाले, ही एक खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. मला बाहिया प्रांताच्या इतिहासात असे कधीही पाहिल्याचे आठवत नाही. शहरे आणि घरांमध्ये पुराचे पाणी भरलेले दिसून येत आहे. येथील स्थिती खूप भयानक आहे. अनेक घरे आणि रस्ते पाण्याखाली बुडाले आहेत.
बाहियातील नागरिक सुरक्षा आणि सुरक्षितता एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे ३५ हजार लोकांना बेघर व्हावे लागले आहे. या दरम्यान, इटांबे शहरात रात्री उशीरा झालेल्या जोरदार पावसामुळे धरण फुटले आहे. ब्राझीलच्या राष्ट्रीय हवामान विज्ञान संस्थेने पूर्ण बाहिया प्रांतात जोरदार पावसाचा अॅलर्ट दिला आहे. सोमवारी आणि मंगळवारी स्थिती तशीच राहील अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.