साखर वाहतुकीसाठी जादा रेक देण्याची अन्न मंत्रालयाची रेल्वेकडे मागणी

नवी दिल्ली : अन्न मंत्रालयाने रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील साखर कारखान्यांना प्राधान्याने रेक उपलब्ध करावेत अशी आग्रही विनंती केली आहे. पुरेशा वॅगन नसल्याने साखरेच्या देशांतर्गत वाहतुकीसह निर्यातीवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील कारखान्यांना साखर देशभरातील ग्राहक केंद्रांपर्यंत नेण्यास अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर लॉजिस्टिकच्या कारणांनी साखर निर्यातीवरही विपरित परिणाम झाला आहे. साखर कारखान्यांच्या साखरेच्या खपावर परिणाम झाल्याचे अन्न मंत्रालयाने रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

याशिवाय लॉजिस्टिक मुद्यांवरुन साखर विक्री करताना कारखान्यांना येणाऱ्या अडचणी पाहता, अन्न मंत्रालयाने अलिकडेच डिसेंबर २०२१ मध्ये मासिक विक्री कोट्याचा कालावधी एक महिना वाढवून ३१ जानेवारी २०२२ केला आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, देशात ४९२ साखर कारखान्यांनी ११५.५५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ४८१ कारखान्यांनी ११०.७४ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा ४.८१ लाख टन साखर उत्पादन वाढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here