भारतात अन्नधान्याचे उत्पादन २.६६ टक्क्यांनी वाढून ३० कोटी ५४.३ लाख टनावर पोहोचणार : सरकार

नवी दिल्ली : कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात चालू हंगाम २०२०-२१ मध्ये अन्नधान्याचे उत्पादन २.६६ टक्क्यांनी वाढून ३० कोटी ५४ लाख टनाच्या उच्चांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे तादूळ, गहू आणि डाळींचे चांगले उत्पादन याला कारणीभूत ठरले आहे. दरम्यान, जुलै २०१९- जून २०२० या कालावधीत देशात गहू, तांदूळ, डाळी आणि इतर अन्नधान्याचे उत्पादन २९.७५ कोटी टन इतके उच्चांकी झाल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान, यंदाच्या हंगामात २०२०-२१ मध्ये तिसऱ्यांदा अनुमान जारी करताना कृषी मंत्रालयाने सांगितले की, अन्नधान्याचे उत्पादन उच्चांकी ३० कोटी ५४.३ लाख टन होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतीच्या उत्पादन वाढीबद्दल शेतकरी आणि संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांसह केंद्र सरकारच्या धोरणांचे कौतुक केले.

उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२०-२१ या वर्षात तांदुळाचे उच्चांकी १२ कोटी १४.६ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी हे उत्पादन ११ कोटी ८८.७ लाख टन होते. गव्हाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या १० कोटी ७८.६लाख टनावरून वाढून उच्चांकी १० कोटी ८७.५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. तर इतर धान्याचे उत्पादन गेल्यावर्षीच्या ४ कोटी ७७.५ लाख टनावरुन वाढून चार कोटी ९६.६ लाख टन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. डाळींचे उत्पादन दोन कोटी ५५.६ लाख टन होण्याची शक्यता आहे. याआधी २०१९-२० मध्ये हे उत्पादनदोन कोटी ३०.३ लाख टन झाले होते.

खाद्यान्न नसलेल्या गटातील तेलबियांचे उत्पादन २०२०-२१ मध्ये तीन कोटी ६५.६ लाख टन होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी हे उत्पादन तीन कोटी ३२.१ लाख टन आहे.

ऊसाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या ३७ कोटी पाच लाख टनावरुन वाढून ३९ कोटी २९.९ लाख टन होण्याचा अंदाज आहे. तर कापसाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तीन कोटी ६०.७ लाख गाठींवरुन वाढून तीन कोटी ६४.९ लाख गाठी (प्रत्येकी १७० किलो) होण्याची अपेक्षा आहे. राज्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here