गाळप परवाना अर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

208

पुणे –  पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा या साखरपट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ऊस पाण्याखाली गेला. यामुळे ऊस पिकाचे आणि पर्यायाने साखर उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. 1 ऑक्टोबरपासून सुरु होणार्‍या हंगामावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. कारखान्यांसमोरील अडचणीही वाढत आहेत. यामुळेच राज्यातील साखर कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामाच्या परवान्यासाठी दि. 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती तर मराठावाडा, विदर्भात असणारा दुष्काळ यामुळे ऊस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुष्काळी भागात जनावराच्या चार्‍यासाठी ऊस पीकाचा वापर करण्यात आला होता. या दोन्ही संकटांमुळे साखर कारखान्यांचे यंदाच्या गळीत हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. सांगली आणि कोल्हापूर सारख्या साखरपट्ट्यांसह मराठवाड्यातील साखर कारखान्यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसणार आहे. यंदाच्या गळीत हंगामाकरिता 30 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत जाहिर करण्यात आली होती. मात्र, राज्यातील कारखान्यांना असंख्य अडचणींमुळे परवाना घ्यायला वेळच मिळालेला नाही. त्यामुळेच परवाना अर्ज भरण्याची मुदत दि. 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

दुष्काळा मुळे आणि जनावरांसाठी ऊस पिकाचा उपयोग चार्‍यासाठी केल्यामुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील 40 कारखान्यांकडून गळीत हंगाम घेण्याची शक्यता नाही. त्याचा परिणाम मराठवड्यातील कारखान्यांच्या साखर उत्पादनावर होणार आहे. गळीत हंगामाकरिता साखर प्रादेशिक संचालकांकडे अर्ज सादर करावयाचा असतो. सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर मंजुरीसाठी अर्ज साखर आयुक्तांकडे पाठविला जातो. दुष्काळ आणि महापूर या दोन्ही नैसर्गिक संकटामुळे यंदाच्या हंगामासाठी राज्यातून केवळ एका साखर कारखान्याचा अर्ज सादर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here