जिल्हा बँकेकडून उसाच्या बिलातून सक्तीची वसुली : शेतकऱ्याचा आरोप

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून उसाच्या बिलातून सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. ही शेतकऱ्यांची पिळवणूक असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केला आहे. सक्तीच्या वसुलीचा शेतकरी संघटना निषेध करीत असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. वास्तविक राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्वच मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून शेतीशी निगडित कर्जाच्या सक्तीच्या वसुलीस स्थगिती दिलेली आहे. तरीही जिल्हा बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करून दुष्काळी परिस्थितीत बेकायदेशीर सक्तीची वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे, असे औताडे यांनी म्हटले आहे.

जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय धाब्यावर बसवला आहे. याबाबत शेतकरी संघटनेच्यावतीने सहकार आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. संघटनेने विभागीय सहनिबंधक नाशिक यांच्याकडे तक्रार केलेली आहे. त्यानंतर सक्तीच्या वसुलीस स्थगितीचे पत्रक जिल्हा बँकेने काढले आहे. दरम्यान, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना तातडीने ई-मेलद्वारे सूचना देऊन जिल्हा बँकेने सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून सुरू केलेली सक्तीची वसुली थांबवण्यात येईल, असे आश्वासन सहकार आयुक्त कवडे यांनी दिल्याचे औताडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here