इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे ₹२०,००० कोटींहून अधिक परकीय चलनाची बचत

नवी दिल्ली : इथेनॉल पुरवठा वर्ष २०२१-२२ (डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२२) या कालावधीत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणापासून परकीय चलनात ₹२०,००० कोटींहून अधिक बचत झाली आहे. राज्यसभेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्यमंत्र्यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील इंधन वितरण कंपन्यांनी २०२१-२२ या कालावधीत इथेनॉल मिश्रणातून ४३३.६ कोटी लिटर पेट्रोलची बचत केली आहे.

वाहतूक क्षेत्राशी संलग्न पर्यावरणीय समस्या दूर करण्यासाठी, कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने २००३ मध्ये इथेनॉल मिश्रीत पेट्रोल (EBP) कार्यक्राला सुरुवात केली. त्याचे उद्दिष्ट ५ टक्के इथेनॉलसोबत पेट्रोल मिश्रण पुरवठा करण्याचे होते. केंद्र सरकारने राष्ट्रीय जैव इंधन धोरणाच्या माध्यमातून २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. देशाने जून २०२२ मध्ये १० टक्के ईबीपी पुरवठ्याचे उद्दिष्ट निर्धारीत वेळेपूर्वी पाच महिने मिळवले आहे. २०१२ मध्ये हे मिश्रण केवळ ०.६७ टक्के होते. २०२५-२६ पर्यंत २० टक्के मिश्रण उद्दिष्ट गाठण्यासाठी १०.१५ बिलियन लिटर इथेनॉलची गरज भासेल.

फ्लेक्स-इंधन वाहन
E२० ईंधन, पेट्रोलसोबत २० टक्के इथेनॉल मिश्रण, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात देशभरातील इंधन वितरण कंपन्यांच्या ८४ आऊटलेट्सवर लाँच करण्यात आले होते. याशिवाय, प्रायोगिक तत्त्वावर  E१०० ची विक्री पुण्यात तीन आउटलेट्सवर सुरू करण्यात आली आहे. फ्लेक्स फ्यूएल इंधनासाठी २० टक्के ते ८५ टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण चालू शकते. भारतीय ऑटोमोटिव्ह निर्माते फ्लेक्स इंधनासाठी आपल्या उत्पादनांचा स्वीकार करण्याची तयारी करीत आहेत. काही उत्पादकांनी अलिकडेच झालेल्या ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये आपल्या फ्लेक्स – फ्युएल वाहने आणि इंजिनांचे सादरीकरण केले. भारतामध्ये इथेनॉलच्या बाजारपेठेत अलिकडेच मुख्यत्वे कीटाणुनाशक, पेय पदार्थ आणि इतर औद्योगिक घटकांची मागणी वाढली आहे. याबाबतच्या अनुमानानुसार, भारतीय इथेनॉल बाजार २०२७ पर्यंत ५.६४ अब्ज डॉलर (जवळपास ४०,५९३ कोटी रुपये) पर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here