साखर कामगारांच्या पगाराचा मार्ग मोकळा

कामगार न्यायालयाने तीन जानेवारी २०२० ला पगाराची रक्कम तपासून निश्चित केल्यामुळे कन्नड सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या पगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. जवळजवळ १o वर्षांपासून कामगारांचा पगार थकीत होता.

शहरातील सरस्वती कॉलनीतील राधाकृष्ण मंदिरात रविवारी सकाळी कामगारांची कामगार न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी कामगारांची देणी पूर्ण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवावा,’ असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

कन्नड सहकारी साखर कारखाना २००९ मध्ये बंद झाला तेव्हा अनेक कर्मचारी कार्यरत होते. यापैकी अनेक कर्मचारी मरण पावले आहेत. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी कारखाना विकला. कामगारांचा पगार व इतर देणी बाकी होती. त्यामुळे कामगारांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. कारखाना विकून मिळालेली रक्कम बँकेच्या नो लीन अकाउंटमध्ये जमा करावी, कामगारांनी त्यांचा पगार कामगार न्यायालयाकडून तपासून निश्चित करून घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर कामगार संघटनेने कामगार न्यायालयात पगार निश्चितीसाठी प्रकरण दाखल केले होते. त्यानुसार ही पगार निश्चिती होऊन कामगारांना पगार मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

या बैठकीला कामगार संघटनेतर्फे अ‍ॅड. कृष्णा जाधव, लालमियाँ शहा, व्ही. एन. पाटणी, कृष्णा मोहिते, पी. के. चव्हाण, आर. व्ही. शिंदे, टी. एस. चव्हाण, गंगा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here