G 20 चा U20 प्रतिबद्धता गट अहमदाबाद येथे 2 दिवसांच्या महापौर शिखर परिषदेचे आयोजन करणार

अहमदाबाद शहर 7-8 जुलै, 2023 रोजी होणाऱ्या अर्बन20 (U20) महापौर शिखर परिषदेच्या आयोजनासाठी सज्ज आहे. या महापौर परिषदेच्या निमित्ताने G20 राष्ट्रांमधील अनेक शहरांचे नेते आणि महापौर एकत्र येण्याची शक्यता आहे. या शिखर परिषदेला विविध शहरांचे प्रतिनिधीत्व करणारे प्रतिनिधी, ज्ञान भागीदार, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना, शैक्षणिक संस्था आणि केंद्र तसेच राज्य सरकारचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

U20 हा भारताच्या G20 अध्यक्षतेअंतर्गत एक प्रतिबद्धता गट आहे. हा एक शहरी मुत्सद्देगिरी उपक्रम आहे आणि यात G20 देशांतील शहरांचा समावेश असून शहरांमधील सहकार्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाचा जागतिक अजेंडा पुढे नेण्यात शहरांची भूमिका यावर भर दिला जातो. अहमदाबाद हे सध्याच्या सहाव्या बैठकीसाठी U20 चे अध्यक्षपद भूषवत आहे आणि तांत्रिक सचिवालय म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स आणि नोडल मंत्रालय म्हणून गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय सहकार्य करत आहे.

फेब्रुवारी 2023 मध्ये U20 शहरी शेर्पा बैठक यशस्वी झाली होती ज्यामध्ये U20 शहरांमधून आतापर्यंतची सर्वाधिक वैयक्तिक उपस्थिती होती. त्यात सहा प्राधान्य क्षेत्रांवर चर्चा करण्यात आली होती आणि U20 निष्कर्षांमध्ये समाविष्ट करण्यासाठी अंतिम स्वरूप देण्यात आले होते. हे सहा प्राधान्यक्रम जगभरातील शहरांना भेडसावणाऱ्या गंभीर नागरी समस्या आणि आव्हाने प्रतिबिंबित करतात. यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदार वर्तनांना प्रोत्साहन देणे, हवामान संबंधी वित्तपुरवठा वाढवणे, पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे, डिजिटल शहरी समावेशकतेला चालना देणे, नागरी प्रशासन आणि नियोजनासाठी आराखड्याची पुनर्रचना करणे आणि स्थानिक संस्कृती आणि अर्थव्यवस्थेला चालना देणे यांचा समावेश आहे.

महापौरांमधील चर्चेव्यतिरिक्त, आगामी महापौर शिखर परिषदेचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे U20 प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करणारी चार संकल्पना आधारित सत्रे असतील. जगभरातील 20 हून अधिक महापौर आणि भारतातील शहरांमधील सुमारे 25 महापौर एकत्र येतील आणि त्यांच्या संबंधित शहर स्तरावरील कृती आणि उपक्रमांबद्दल त्यांचे अनुभव सामायिक करतील. या सत्रांमध्ये सहा U20 प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सहा श्वेतपत्रिकाही मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध केल्या जातील. महापौरांसाठी आणखी एक विशेष सत्र म्हणजे U20 संयोजक, UCLG आणि C40 तसेच ब्युनोस आयर्स, साओ पाउलो आणि अहमदाबाद शहरांच्या नेतृत्वाखालील हवामान वित्तविषयक एक गोलमेज बैठक असेल.

शहरी लवचिकता, गुंतवणुकीसाठी शहराची तयारी, समावेशकता , चक्रीय अर्थव्यवस्था आणि डेटा आधारित प्रशासन ,भारत आणि जगभरातील विविध शहरांमधील संस्थांनी केलेले संशोधन आणि कार्य या पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी परिषदेदरम्यान विशेष सत्रे नियोजित आहेत.

कोणत्याही U20 महापौर शिखर परिषदेचा मुख्य निष्कर्ष म्हणजे उपस्थित महापौरांद्वारे G20 नेत्यांना U20 घोषणापत्र सुपूर्द करणे. U20 घोषणापत्र हे कृतीभिमुख आणि एकत्रितपणे तयार केलेला दस्तावेज आहे, जो G20 अजेंडा पुढे नेण्यात शहरे काय भूमिका बजावू शकतात याची सविस्तर माहिती तसेच अनेक शहरांच्या शिफारशी आणि समर्थनांचा त्यात समावेश आहे.

या कार्यक्रमात भारताची शहरी कथा, विशेषत: शहर पातळीवरील यश, उल्लेखनीय प्रकल्प आणि अभिनव उपक्रम दाखवणारे प्रदर्शनही आयोजित केले जाईल. शहरी भागांवर हवामान बदलाचा आणि हवामान बदलांवर शहरी भागांच्या बहुआयामी परिणामांबद्दल जागरूकता वाढवण्यास मदत करण्यासाठी निवडक चित्रपट देखील प्रदर्शित केले जातील.

महापौर परिषदेचा एक भाग म्हणून, सहभागी महापौर आणि प्रतिनिधींना देखील अहमदाबाद शहरातील ऐतिहासिक रस्ते आणि स्मारकांच्या सहलीसाठी नेले जाईल आणि शहराच्या चैतन्यशील संस्कृतीची ओळख करून दिली जाईल. महापौर U20 उद्यानात वृक्षारोपण करतील तसेच साबरमती आश्रमालाही भेट देणार आहेत. पाहुण्यांसाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि अनुभवांचे नियोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये गुजरात आणि संपूर्ण भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखवला जाणार आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here