सीमाभागातील कारखान्याना कर्नाटकातील ऊसाचा आधार

गडहिंग्लज: गडहिंग्लज उपविभागातील ऊसाचे उत्पादन दरवर्षीपेक्षा 15 टक्क्यांपर्यंत घटले असले तरी ही तूट कारखान्यांनी कर्नाटकातील ऊसातून भरून काढल्याचे सांगण्यात येते. वास्तविक, कृषी विभागाने नैसर्गिक आपत्तीमुळे 30 टक्के घटीची शक्यता वर्तविली होती; परंतु त्या अंदाजानुसार ऊसाची घट झाली नसल्याचेही कारखान्यांच्या गाळपावरून स्पष्ट होत आहे.

महापूर आणि अतिवृष्टीमुळे यंदाचा हंगाम कारखान्यांना जड जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे कारखानदारही आपल्या कारखान्यात अधिकाधिक गाळप करण्यासाठी सुरूवातीपासूनच कंबर कसत होते. महापुराच्या पाण्यात बुडालेल्या ऊसाचे मोठे नुकसान झाले; परंतु अतिवृष्टीचा फार मोठा परिणाम ऊसावर जाणवला नसल्याचे चित्र आहे.

यंदा चंदगडचा दौलत साखर कारखाना सुरू झाला, तर आजरा कारखाना बंद झाला. त्यामुळे आजर्‍यातील उपलब्ध अडीच लाख टनांचा ऊस तांबाळे, बिद्री, सेनापती, हेमरस, दौलत, गडहिंग्लज या कारखान्यांमध्ये गाळपासाठी विभागला गेला. आजर्‍यातील सर्वाधिक ऊस तांबाळे कारखान्यात गाळप झाल्याचे सांगण्यात आले. या कारखान्याने आजर्‍यात मोठी यंत्रणा लावली होती. भागातील बहुतांश ऊस सेनापती कारखान्याला गेला. दौलत कारखाना सुरू झाल्याने इको आणि हेमरसकडे वळणारा काही ऊस या कारखान्यात पोहोचला.

याउलट अगदी कर्नाटकला लागून असलेल्या इको व हेमरस कारखान्यांना कर्नाटकातून ऊसाची आवक चांगली झाली. गडहिंग्लज, हेमरस, इको-केन, दौलत कार्यक्षेत्रातील काही ऊस सेनापती, शाहू, बेडकीहाळ या कारखान्यांनीही उचलला आहे. तरीसुद्धा सरासरी इतक्या गाळपाजवळ कारखाने पोहोचले.

हेमरस कारखान्याने 2 मार्चअखेर 5 लाख 91 हजार 840 टन ऊसाचे गाळप केले. 12.83 टक्के उतार्‍याने गाळप झाले. अजून हा कारखाना आठ दिवस चालेल, असा अंदाज आहे. तोपर्यंत त्याचे गाळप 6 लाख 20 हजार टनांपर्यंत होईल, असे सांगण्यात येते. गतवर्षी कारखान्यात 6 लाख 50 हजार टन गाळप झाले होते. म्हाळंगेच्या इको केन कारखान्यात 2 मार्चपर्यंत 2 लाख 97 हजार टन गाळप झाले आहे. 11.70 च्या सरासरीने ऊस गाळला आहे. अजून आठ दिवसांपर्यंत हा कारखाना चालणार असून 3 लाख 10 हजार टनांपर्यंत गाळप जाईल, असा अंदाज आहे.

यंदा दौलत साखर कारखाना अथर्व कंपनीला चालवण्यासाठी देण्यात आला. मुळात गाळप हंगाम सुरु करणे कंपनीसमोर आव्हानाचे होते. संकटेही अनेक होती जुनी मशिनरी आणि इतर कामे करुन मग गाळप सुरु करणे आवश्यक होते. तरीही इतर कारखान्यांच्या स्पर्धेत उतरुन यंदा 11.71 च्या सरासरीने 2 लाख 39 हजार टन ऊसाचे गाळप दौलतने यशस्वी करुन दाखवले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here