इथेनॉल अर्थव्यवस्थेचे भविष्य उज्ज्वल: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली : इथेनॉल अर्थव्यवस्थेचे भविष्य उज्ज्वल आहे आणि साखर क्षेत्राने अतिरिक्त उत्पादन बायो इथेनॉलमध्ये बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यातून कृषी क्षेत्रासोबतच देशाच्या ग्रामीण भागात अधिकाधिक धन निर्माण होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. चीनीमंडी द्वारे आयोजित शुगर अँड इथेनॉल इंडिया कॉन्फरन्समध्ये आभासी स्वरुपात सहभाग नोंदवताना, त्यांनी सांगितले की, भारतीय वाहतूक क्षेत्राच्या ऊर्जेची गरज ८० टक्के पेट्रोल, डिझेल आदी जीवाश्म इंधनाच्या आयातीपासून भागवली जात आहे. त्यामुळे देशाचे वार्षिक १६ लाख कोटी रुपये खर्च होत आहेत. ते म्हणाले की, केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलची आयात कमी करण्यासाठी इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे आणि इथेनॉल उद्योगाचे भविष्य खूप उज्ज्वल आहे.

त्यांनी सांगितले की, पेट्रोल, डिझेल आयात ही आर्थिक आणि पर्यावरणीयसुद्धा समस्या आहे. वाहतूक क्षेत्रही ९० टक्के कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार आहे. वाहतूक क्षेत्राला तत्काळ डी-कार्बोनाइज करण्याची आवश्यकता आहे. सरकारने जैव इंधनाच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले आहे. केंद्र सरकार इंधनाच्या रुपात इथेनॉलला प्रोत्साहन देत आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांनी सांगितले की, खराब धान्यापैकी तांदूळ, मक्का आणि अतिरिक्त उसाचा वापर करून इथेनॉल उत्पादन वाढवले जात आहे. भारताकडे जागतिक स्तरावर जैव इंधन उत्पादनाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. भारत हा असा एकमेव देश आहे, जो जैव इंधनासाठी चार व्यावसायिक प्रकल्प उभारत आहे. यापैकी तीन प्रकल्प हे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहेत. प्रत्येक प्रकल्पातून दोन लाख शेतकऱ्यांना मदत मिळेल आणि तीन लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here