सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलची दरवाढ, महागाईचा भडका

40

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शुक्रवारी, २९ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा वाढ झाली. सलग तिसऱ्या दिवशी तेल वितरण कंपन्यांनी इंधन दरात ३५-३५ पैसे प्रती लिटर वाढ केली आहे. या आठवड्यात सोमवार आणि मंगळवारी दर स्थिर राहिल्यानंतर बुधवारी सातत्याने दर वाढ झाली आहे. तेल वितरण कंपन्या २८ सप्टेंबरपासून पेट्रोलच्या दरात वाढ करीत आहेत. त्यानंतर २४ वेळा पेट्रोलमध्ये ७.४५ रुपये प्रती लिटर वाढ केली आहे. तर २४ सप्टेंबरपासून २५ वेळा डिझेलच्या दरात वाढ केली असून ८.७५ रुपये प्रती लिटर दरवाढ झाली आहे.

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल सप्टेंबरपासून १७ टक्के महागले आहे. सप्टेंबर महिन्यात ७३.१३ डॉलर प्रती बॅरल असलेले कच्चे तेल आयात करण्यात आले होते. तर या आठवड्यात ब्रेंट क्रूड फ्यूचरची किंमत ८६.४३ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचली आहे.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि केंद्र तसेच राज्य सरकारने वाढीव कर लागू केल्याने जनतेवर तेलाच्या दराचे संकट निर्माण झाले आहे. याबाबत अर्थशास्त्रज्ञ किरीट पारीख यांनी सांगितले की, भारतात टॅक्स जादा आहे. पेट्रोलवर ५४ टक्के कर लागू करण्यात आला आहे. तर डिझेलवर ४८ टक्के कर आहे. सरकारने कर कमी करण्याची गरज आहे. जर सरकारने कर कमी केला नाही, तर त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल असे त्यांनी सांगितले.

नव्या दरवाढीने दिल्लीत पेट्रोल १०८.६४ प्रती लिटर तर डिझेल ९७.३७ प्रती लिटरवर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोल ११४.४७ रुपये प्रती लिटर आणि डिझेल १०५.४९ प्रती लिटवर गेले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०९.१२ रुपये प्रती लिटर असून डिझेल १००.४८ रुपये प्रती लिटर झाले आहे. चेन्नईत पेट्रोल १०५.४३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल १०१.५९ रुपये प्रती लिटरने विक्री सुरू आहे. नोएडात १०५.७८ रुपये प्रती लिटरने पेट्रोल असून डिझेल ९८.०२ रुपये दराने मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here