घुले – पाटील कारखान्याच्या हंगामाची सांगता, ११ लाख टन उसाचे गाळप : अध्यक्ष नरेंद्र घुले

नेवासा : भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देणे, हेच एकमेव उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांनी केले. प्रतिकूल परिस्थिती असतानाही सर्वांच्या सहकार्याने यावर्षीचा गळीत हंगाम यशस्वी झाला. हंगामात ११ लाख ४० हजार टन उसाचे गाळप होऊन ११ लाख ५१ हजार क्विटल साखर निर्मिती झाली, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. कारखान्याच्या ५० व्या गळीत हंगामाची सांगता गुरुवारी झाली. यावेळी ते बोलत होते.

संचालक शिवाजीराव कोलते, निर्मला कोलते यांच्या हस्ते ऊस गव्हाण पूजन करण्यात आले. अध्यक्ष घुले यांनी सांगितले की, कारखान्याने सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण झालेली पाच कोटी युनिट वीज निर्यात केली आहे. डिस्टिलरीच्या यावर्षीच्या हंगामात १ कोटी ५० लाख लिटर रेक्टिफाइड स्पिरिट व १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉलची निर्मिती होणार आहे. यावेळी कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, तज्ज्ञ संचालक डॉ. क्षितिज घुले, काशीनाथ नवले, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here