उसाला एकरकमी प्रती टन ३५०० रुपये द्या : ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषदेत मागणी


कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रती टन ३,५०० रुपये एकरकमी उचल द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. जोपर्यंत ही मागणी मान्य केली जात नाही, तोपर्यंत साखर कारखाने सुरू करू देणार नाही, अशा इशाराही शेट्टी यांनी दिला. जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २२ वी ऊस परिषद झाली. परिषदेत शेट्टी यांनी गेल्यावर्षीच्या उसाला प्रती टन ४०० रुपये जादा देण्याचा आपला आग्रह कायम ठेवला.

गेल्या हंगामात साखरेवर निर्यातबंदी लावल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे भाव व देशांतर्गत बाजारातील भाव यातील फरकाची रक्कम तातडीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी. याशिवाय, नाबार्डने कारखान्यांना साखर तारण कर्ज ४ टक्के व्याज दराने थेट देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. राजू शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकारने दुष्काळाचे निकष बदलावेत अशी जोरदार मागणी केली. ते म्हणाले की, राज्य शासनाने ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे निकषात बदल करून सर्कलनिहाय दुष्काळ जाहीर करून खरीप पीक वाया गेले असल्याने नुकसान भरपाई द्यावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्यात एफआरपी देण्याची केलेली कायद्यातील दुरुस्ती  बेकायदेशीर आहे. सरकारने ही दुरुस्ती तत्काळ रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here