हंगाम २०२२-२३ मध्ये जगभरातील तांदूळ उत्पादन, गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत प्रथमच कमी होण्याचे अनुमान वर्तविण्यात आले आहे. चीनपासून दक्षिण आशिया आणि कॅलिफोर्नियापर्यंत झालेल्या भाताच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. युक्रेन-चीन युद्धानंतर जगभरात इतर कृषी उत्पादनांच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली. मात्र, आघाडीचा निर्यातदार देश असलेल्या भारताकडून झालेल्या मोठ्या पुरवठ्यामुळे जागतिक स्तरावर तांदळाच्या किमती कमी होण्यात मदत झाली. मात्र, आता पुरवठ्याबाबत कडक भूमिका घेतल्याने जगातील तिसऱ्या क्रमांकाचे धान्य असलेल्या तांदळाच्या किमतीवरील दबाव वाढू शकतो. त्यामुळे अनेक देशांमध्ये अन्न सुरक्षा आणि अन्नधान्याच्या किमतीची चलनवाढ होण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे.
डेटा अॅनालिटिक्स, अॅप्स आणि इंडेक्सचे व्यासपीठ असलेल्या ग्रो इंटेलिजन्सच्या वृत्तानुसार, जागतिक स्तरावर, तांदळाचा साठ्यामध्ये गेल्यावर्षी किंचित घसरण झाली. मात्र आता ही घसरण वाढण्याचा अंदाज आहे. २०२२-२३ मधील तांदूळ साठा गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचेल अशी शक्यता आहे. इतर धान्याच्या तुटवड्यांमुळे तांदूळ पुरवठ्यावरील दबाव वाढला आहे. सद्यस्थितीत चीन वगळता जागतिक स्तरावरील गहू साठा २०२२-२३ मध्ये गेल्या चौदा वर्षांतील सर्वात कमी पातळीवर जाण्याचा अंदाज आहे. जगातील पहिल्या क्रमांकाचा निर्यातदार असलेल्या भारताने सप्टेंबर महिन्यात तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. आणि इतर काही खास प्रकारच्या तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क आकारणी केली आहे. USDA च्या अंदाजानुसार तांदळाचे जागतिक उत्पादन दरवर्षी साधारणतः २ टक्क्यांनी खालावण्याची शक्यता आहे. सर्वात मोठा तांदूळ उत्पादक आणि ग्राहक असलेल्या चीनमधील दक्षिणेकडील प्रांतांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय, भारताच्या ईशान्येकडील दुष्काळी स्थितीमुळे तांदळाचे उत्पादन कमी होईल. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे भात शेती उद्ध्वस्त झाली आहे. अतिशय कमी प्रमाणात पिक हाती येणार आहे.