गोवा : बंद पडलेल्या साखर कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भविष्य अंधःकारमय

सांगे : राज्य सरकारकडून संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे अथवा त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. २०२१ मध्ये कारखान्यात प्रस्तावित इथेनॉल युनिट स्थापन करण्याबाबतही कोणतीच प्रगती झालेली नाही. त्यामुळे साखर कारखान्याचे भविष्य अंधःकारमय दिसत असल्याचे सांगेतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. सांगेतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी वाडे येथे बैठक घेतली. सरकारने संजीवनी साखर कारखाना त्वरीत सुरू करावा अथवा लवकरात लवकर इथेनॉल प्लांट सुरू करावा, अशी मागणी केली. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास व्यापक आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

ऊस उत्पादक शेतकरी पॅटी फर्नांडिस यांनी सांगितले की, ऊसाची शेती हा आमच्या जगण्याचा मुख्य स्त्रोत आहे. गेली अनेक दशके आम्ही यावरच अवलंबून आहोत. सरकारने साखर कारखाना बंद करून आमचे उत्पन्न आणि जगण्याचा एकमेव मार्ग बंद केला. शेतकरी सगुण गावकर यांनी सांगितले की, आम्ही संजीवनी साखर कारखान्याच्या मालकीच्या जमिनीचे भागधारक आहोत. सरकार असो वा अधिकारी, साखर कारखान्याची जमीन विक्री करण्याचे कोणालाच अधिक नाहीत. राज्यात ८०० कुटूंबे संजीवनी साखर कारखान्यावर अवलंबून आहेत. सरकारने जर कारखाना सुरू करण्याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here