गोवा : कमी नफ्यामुळे गूळ उत्पादनाकडे फिरवली पाठ

मडगाव : ऊस तोडणी हंगामासह गोव्याच्या काही भागातील आदिवासी समाज ऊसापासून गूळ उत्पादनात गुंतले आहेत. एकेकाळी हा संपन्न कुटीर उद्योग होता. मात्र, हा पारंपरिक व्यवसाय आता जीवंत राहण्यासाठी संघर्ष करीत आहे. युवा पिढीकडे या कष्टाच्या व्यवसायात सहभागी होण्यासाठी वेळही नाही आणि त्यातून नफा मिळत नसल्याने त्याबाबत स्वारस्य नाही. काहीजण अनंत अडचणी सोसून या कुटीर उद्योगाची परंपरा जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पारंपरिक बैलांवर चालणाऱ्या गुऱ्हाळांची जागा आता यांत्रिक, डिझेलवर चालणाऱ्या क्रशरने घेतली आहे. मात्र, गूळ उत्पादन प्रक्रियेने शेती आणि ऊस तोडणीनंतरच्या सेंद्रीय उत्पादन प्रक्रियांना जैसे थे ठेवले आहे.

ऊस सोडणीचा हंगामाच्या सुरुवातीला क्रशर शेतांच्या आसपास भाड्याने घेतले जातात. तेथे तात्पुरती शेडची उभारणी केली जाते. तोडलेला ऊस बांधून क्रशिंग युनिटमध्ये टाकला जातो. त्याचा रस एका बड्या ड्रममध्ये ओतून एकत्र केला जातो. हा रस लोखंडी कढईत टाकून भट्टीवर तो गरम केला जातो. त्यानंतर त्यास उकळले जाते. ही प्रक्रिया रसाचा चिकटपणा वाढण्यासह त्याचा पिवळा, सोनेरी रंग येईपर्यंत केली जाते. ऊसाचा रस एक तृतीयांश घटल्यानंतर तो थंड करून लाकडी साच्यामध्ये ओतला जातो. त्याला थंड होईपर्यंत योग्य तो आकार दिला जातो. पौष्टिक गुणांनी यु्क्त तसेच औषधी गुण असलेले गोव्यातील हे शुद्ध जैविक उत्पादन खाण्यासाठी आणि विक्रीसाठी तयार केला जातो. ग्रामीण भागात ऊस शेती घटलत असल्याने अशा प्रकारचे क्रशरमधील गूळ उत्पादनही सातत्याने घटू लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here