गोवा : संजीवनी साखर कारखान्याच्या जमिनीचे फॉरेन्सिक विद्यापीठाला हस्तांतरण

पणजी : मंत्रि परिषदेने संजीवनी साखर कारखान्याची ४ लाख स्क्वेअर मीटर जमीन प्रस्तावित फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीला हस्तांतरीत करण्यास मंजूरी दिली. अलिकडेच गृह मंत्री अमित शहा यांनी या फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कोनशीलेचे अनावरण केले होते. जमीन हस्तांतरणावेळी सरकार आणि संजीवनी सहकारी साखर कारखाना लिमिटेड (एसएसएससीएल) यांच्यामध्ये करार करण्यात आला आहे. त्यानुसार, या जमिनीच्या हस्तांतरणानंतर एसएसएसकेएलला भरपाई मिळणार आहे.

याबाबत मंत्रिमंडळाच्या आदेशात म्हटले आहे की, महसूल विभागाने पिळर्ण गावातील जमिनीसाठी निश्चित केलेला दर लक्षात घेता ४ लाख स्क्वेअर मीटर क्षेत्रफळासाठी १२३० रुपये प्रती स्क्वेअर मीटर दरानुसार या जमिनीसाठी ४९.२ कोटी रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राज्य सरकारने राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय कायदा विद्यापीठासाठी जमीन हस्तांतरण प्रकरणात विधानसभेत सरकारने खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कारखान्याची २ लाख स्क्वेअर मीटर जमीन हस्तांतरीत केली जाईल असे सांगितले होते. प्रत्यक्षात त्याच्या दुप्पट जमीन हस्तांतरणाचा आदेश देण्यात आला आहे, असा आरोप आमदार गावकर यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here