‘गोडसाखर’ कारखाना ३,१११ रुपये ऊस दर देणार : अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर

कोल्हापूर : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना यावर्षी ऊसाला प्रती टन ३,१११ रुपये दर देणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी केली. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. शहापूरकर म्हणाले की, कारखान्यातील तांत्रिक बदलामुळे ऊस गाळपास थोडा विलंब झाला आहे. पण एक जानेवारीपासून नियमीतपणे दररोज ३५०० मे. टन ऊस गाळप केले जाईल. कारखान्याने डिजिटल वजन काटा बसवला आहे. असा बदल करणारा हा जिल्ह्यातील पहिला कारखाना आहे.

अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांनी सांगितले की, ऑनलाईन वजनकाट्यामुळे वजनात तफावत येणार नाही. शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनाची माहिती त्वरीत शेतकऱ्याला मोबाईलवर मिळेल. यंदा अडीच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. कारखान्याकडे ३८५ टोळ्या नोंदणीकृत आहेत. बुधवारपासून कारखाना सुरू झाला असून चार दिवसात तो पूर्ण क्षमतेने सुरू होईल. केडीसीसी बँकेने ५० कोटी रुपये कर्ज पुरवठा केला आहे. कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची मंजुरी अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षी इथेनॉल प्रकल्प सुरू होईल. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक सतीश पाटील, विद्याधर गुरबे, प्रकाश पताडे, बाळासाहेब देसाई, शिवराज पाटील, ॲड. दिग्वीजय कुराडे आदींसह संचालक व मान्यवर अशोक मेंडूले, प्रकाश पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here