चित्तूर : जे ऊस उत्पादक शेतकरी गूळ उत्पादनावर अवलंबून आहेत, त्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अबकारी मंत्री के. नारायण स्वामी यांनी केले. ते म्हणाले, काळा गूळ विक्रीवर लागू केलेले निर्बंध पाहता मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशी शेतकरी, व्यापाऱ्यांशी संबंधित मुद्यांवरल चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. मंत्री के. नारायण स्वामी यांनी काळा गूळ विक्रेते आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत आयोजित एका बैठकीत सांगितले की, फक्त चित्तूरच नव्हे तर राज्यात इतर ठिकणीही अवैध दारूच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांकडून काळ्या गुळाच्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईचा उद्देश अवैध दारुची तस्करी थांबवणे हा आहे. शेतकरी तसेच गूळ व्यावसायिकांना त्रास देण्याचा सरकारचा अजिबात हेतू नाही.
पोलीस अधिक्षक वाय. रिशांत रेड्डी यांनी गूळ उत्पादक शेतकऱ्यांना सांगितले की, अवैध दारू तयार करणाऱ्या लोकांना गूळ विक्री करू नये. काही अपवाद वगळता सर्व शेतकरी पोलिसांना सहकार्य करीत आहेत असेही ते म्हणाले. दरम्यान, गूळ व्यापारी संघाने उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गूळाची विक्री करण्यावर लागू निर्बंध हटविण्याची मागणी केली. चित्तूर आणि तिरुपती जिल्ह्यात साखर कारखाने नसल्याने त्यांना निकषानुसार काळा गूळ तयार करणे अनिवार्य ठरते असे त्यांचे म्हणणे आहे.