मधुकर सहकारी साखर कारखान्यासाठी 7 कोटींची शासन थकहमी मंजूर

1251

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

फैजपूर (जि. जळगाव) येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यास जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पूर्व हंगामी अल्प मुदत कर्ज घेण्यासाठी 7 कोटी रुपयांची शासन थकहमी देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या साखर मालतारण खाती अपुरा दुरावा (शॉर्ट मार्जिन) आहे. यामुळे जिल्हा बँकेकडून या कारखान्यास कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने शेतकरी व कामगार हितास्तव कारखाना सुरु होणे अत्यंत आवश्यक आहे. या कारणाने, या वर्षापुरते कारखान्याच्या गाळप क्षमतेनुसार अनुज्ञेय असलेल्या ७ कोटी रुपये रकमेच्या पूर्व हंगामी अल्प मुदत कर्जास शासन थकहमी देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यात मागील ५ ते ६ वर्षांपासून असलेली दुष्काळी पर‍िस्थ‍िती, साखरेचे कमी झालेले दर, साखर कारखान्यांची हलाखीची आर्थिक स्थिती या पार्श्वभूमीवर कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, शेतमजूर व साखर कारखान्यांचे कर्मचारी यांच्या हितासाठी कारखाने सुस्थ‍ितीत सुरु ठेवता यावेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम देता यावी, यासाठी थकहमी देण्याचा हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here