आता सर्वांना एकाच दिवशी पगार

103

नवी दिल्ली: ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या विषयाला हात घातल्यानंतर आता केंद्र सरकार ‘वन नेशन, वन पे डे’ या सूत्रावर काम करत आहे. एकाच दिवशी देशातील सर्व क्षेत्रातील कामगारांना पगार देण्याचा विचार सुरू असून त्याबाबतचा कायदा तयार करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत, असं केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले. देशातील सर्व सेक्टरमधील कामगारांसाठी समान कार्यक्रम लागू करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. त्यामुळे कामगारांना त्याचा फायदाच होणार आहे. त्यांची स्थिती सुधारण्यात त्याची मदत होईल. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि वर्किंग कंडिशन कोड आदी लागू करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरु असल्याचे संतोष गंगवार यांनी सांगितले.

हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड लोकसभेत २३ जुलै २०१९ रोजी सादर केले होते. १२ मजूर कायद्यांचं एकत्रिकरण करून हा कायदा तयार करण्यात आला होता. त्याशिवाय या कायद्यात अनेक तरतुदींचाही समावेश करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यापासून ते त्याच्या मोफत आरोग्य तपासणीपर्यंतच्या बाबींचा त्यात समावेश होता. देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना कामगारांना पगार दिला जातो. काही ठिकाणी महिन्याच्या १ तारखेला तर काही ठिकाणी १० तारखेला पगार दिला जातो. काही सेक्टरमध्ये तर महिन्याच्या २५ तारखेलाही पगार दिला जातो. शिवाय अनेक असंघटीत क्षेत्रात महिन्यातून दोनदा पगार दिला जातो. अनेक ठिकाणी रोख पगार दिला जातो, तर काही ठिकाणी थेट बँकेत पगार जमा होतो. देशात कुठेही पगाराच्या बाबतीत एकसूत्रीपणा नसल्याने त्यात एकसूत्रीता आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘वन नेशन, वन पे डे’ ही संकल्पना राबविण्याचा विचार सुरू केला आहे. त्याला उद्योग, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here