नवी दिल्ली: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी शेतकरी आणि शेतकरी संघटनांची बैठक घेतली.केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितले की, सरकार महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमधून किमान आधारभूत किंमतीवर (एमएसपी) सोयाबीन पिकाची खरेदी करेल. सरकारने इतर देशातून तेलावर आयात शुल्क वाढवल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश यांना एमएसपीवर सोयाबीन खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. जेव्हा आमच्या तेलबियाच्या किमती घसरल्या तेव्हा आम्ही तेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. इतर देशांतून तेल आयातीवर 27.5 टक्के आयात शुल्क आकारण्यात आले असून, देशात सोयाबीनसह तेलबियांच्या किंमती वाढू लागल्या आहेत आणि मला आशा आहे की, त्या किमती ‘एमएसपी’पर्यंत पोहोचतील.
बुधवारी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमीत कमी 50 टक्के नफा मिळावा, असा संकल्प केला आहे.बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) विपणन हंगाम २०२५-२६ साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (MSP) वाढ करण्यास मंजुरी दिली.
एका निवेदनानुसार, सरकारने रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळावा. रेपसीड आणि मोहरीसाठी 300 रुपये प्रति क्विंटल आणि त्यापाठोपाठ मसूरसाठी 275 रुपये प्रति क्विंटल वाढ जाहीर केली आहे. हरभरा, गहू, करडई आणि बार्लीसाठी अनुक्रमे 210 रुपये, 150 रुपये, 140 रुपये आणि 130 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे.