नवी दिल्ली : एफसीआयने वर्ष २०२२-२३ मध्ये २१ नोव्हेंबरअखेर २७७.३७ लाख भात खरेदी केले आहे. तर एक वर्षापूर्वी समान कालावधीत २६३.४२ लाख टन भाताची खरेदी करण्यात आली होती. सरकारने सांगितले की गव्हाच्या दरावर नजर ठेवण्यात आली आहे. जर किरकोळ बाजारात गहू दरात भरमसाठ वाढ दिसून आली तर त्याला आळा घालण्यासाठी पावले उचलण्यात येतील. निर्यातीवर निर्बंध घातल्यानंतरही गव्हाच्या किमती वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यादरम्यान केंद्रीय अन्न सचिव संजीव चोपडा यांनी सांगितले की, गहू आणि तांदळाच्या साठ्याची स्थिती समतोल आहे. सरकारच्या बफर स्टॉकपेक्षा अधिक साठा उपलब्ध आहे.
टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, अन्न सचिव चोपडा यांनी पत्रकारांना सांगितले की, तांदळाच्या किमती स्थिर आहेत. मात्र मे महिन्यात गव्हाच्या किमतींवर निर्बंध लागू करण्यात आल्यानंतरही दरात सात टक्क्यांची वाढ झाली आहे. जर आपण एमएसपीतील वाढ लक्षात घेतली तर ही दरवाढ ४ ते ५ टक्के आहे. मे महिन्यात सरकारने देशांतर्गत पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. देशांतर्गत उत्पादनातील घसरण आणि खासगी घटकांकडून केल्या जाणाऱ्या मोठ्या खरेदीमुळे सरकारकडील २०२२-२३ या वर्षातील गव्हाचा साठा ४३४.४४ लाख टनावरून घसरून १८७.९२ लाख टनावर आला आहे.