अंबाला : अंबाला विभागातील ऊस उत्पादक शेतकरी नारायणगड साखर कारखान्याबाहेर गेल्या वीस दिवसांपासून ऊस बिलांप्रश्नी आंदोलन करीत आहेत.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याकडे २०२१-२२ या गळीत हंगामात जवळपास ८३.५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. आतापर्यंत कारखान्याने २७ जानेवारी २०२२ पर्यंतच्या बिलास मंजुरी दिली आहे. नारायणगड साखर कारखान्याने २३ नोव्हेंबर २०२१ रोजी २०२१-२२ या गळीत हंगामाची सुरुवात करून ८ एप्रिल रोजी कामकाज बंद केले आहे. कारखान्याचा गळीत हंगाम १३७ दिवस चालला.
उपलब्ध माहितीनुसार, २०२१-२२ या हंगामात कारखान्याने ४६.२५ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. गेल्या २३ वर्षात हे सर्वात कमी ऊस गाळप आहे. २०२०-२१ या हंगामाच्या तुलनेत ३.७५ लाख क्विंटल कमी गाळप झाले आहे. या हिशोबाने जवळपास १६५ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला आहे. शेतकऱ्यांनी २१ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये विविध कृषी विभागातील प्रतिनिधींचा समावेश आहे. शेतकरी २८ मार्चपासून साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन करीत आहेत. याबाबत साखर कारखान्याचे प्रशासक आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी २२ एप्रिल रोजी नारायणगडमध्ये आपले शर्ट काढून निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे.