कर्नाल : सहकारी साखर कारखान्याकडून पुढील गळीत हंगामासाठी शेतांमध्ये जाऊन उसाचा सर्व्हे केला जात आहे. हा सर्व्हे पारदर्शक करण्यात यावा, अशी मागणी भारतीय किसान युनियन (भाकियू) च्या शिष्टमंडळाने केली. या विषयी त्यांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची भेट घेतली. यावेळी बाराहून अधिक गावांतील प्रमुख शेतकरी, कार्यकर्ते आणि कारखान्याच्यावतीने ऊस व्यवस्थापक रामपाल, सीएमओ सत्पाल राठी, तेजपाल शर्मा उपस्थित होते.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भाकियूचे प्रवक्ते सुरेंद्र सागवान चौधरी यांनी सांगितले की, सर्व्हेमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. कारखान्याचे कर्मचारी काही शेतकरी, एजंटांशी हातमिळवणी करून जादा ऊस असल्याचे दाखवत आहेत. नंतर कमी दरात ऊस खरेदी करून तो इतर शेतकऱ्यांच्या नावावर पाठवून एजंटांकरवी नफा कमावला जातो. त्याचा फटका शेतकऱ्यांना आणि कारखान्याला बसतो. याला आळा घालण्याची मागणी सांगवान यांनी केली. याप्रश्नी १२ जून रोजी कारखाना आणि भाकियू यांची संयुक्त बैठक आयोजित करावी अशी मागणी त्यांनी केली.