हरियाणा : ऊस चार फूट सरीने लावण्यासाठी सरकार एकरी ५,००० रुपये प्रोत्साहन अनुदान देणार

पंचकुला : हरियाणा सरकारने ऊस लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी नवी योजना आखली आहे. ऊस तंत्रज्ञान अभियानांतर्गत चार फूट रुंद सरींमध्ये ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रति एकर ५,००० रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. यापूर्वी ही रक्कम प्रति एकर ३,००० रुपये होती, परंतु आता त्यात प्रति एकर २,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हरियाणाचे कृषी, शेतकरी कल्याण मंत्री श्याम सिंह राणा यांनी विभागीय अधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव विजयेंद्र कुमार आणि संचालक राज नारायण कौशिक यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी अर्थसंकल्पात प्रति एकर ५,००० रुपयांच्या प्रोत्साहनपर रकमेची घोषणा केली होती आणि त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे अशी माहिती कृषी मंत्री श्याम सिंह राणा यांनी दिली. ते म्हणाले की, हरियाणाचे शेतकरी केवळ अन्न उत्पादकच नाहीत, तर राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक स्थिरतेचा एक मजबूत आधारस्तंभ आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांना सक्षम करणे हे भाजप सरकारचे प्राधान्य आहे. राणा यांनी सांगितले की, वाढीव प्रोत्साहनपर रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर यांदरम्यान पोर्टलद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष पडताळणीनंतर फेब्रुवारी २०२७ अखेरपर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम वितरित केली जाईल. कृषीमंत्र्यांच्या मते, टिश्यू कल्चरद्वारे उसाची उत्पादकता वाढेल. या पद्धतीने तयार केलेली उसाची रोपे शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिली जातील. ही रोपे कर्नाल सहकारी साखर कारखान्यातर्फे तयार केली जातील.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here