यमुनानगर : येथील सरस्वती साखर कारखान्याच्या दोन गोदामांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे गोदामांमध्ये साठवलेल्या २.२० लाख क्विंटल साखरेपैकी १.१० लाख क्विंटल साखर खराब झाली आहे. यात कारखान्याचे ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पाणी साचल्याने यंत्रसामग्रीचेही नुकसान झाले आहे. कारखान्याच्या मागील बाजूला असलेल्या नाल्याचे पाणी दोन्ही गोदामांमध्ये भरले. या गोदामांमध्ये जवळपास चार फूट पाणी शिरले, त्यामुळे खालपासून वरपर्यंत ओलसरपणा निर्माण झाला आणि १.१० लाख क्विंटल साखर खराब झाली. हरियाणा व्यतिरिक्त, कारखान्यातून हिमाचल, उत्तर प्रदेश, कोलकाता, आसाम, पंजाब आणि जम्मू काश्मीरला साखर पाठवली जाते.
सरस्वती साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक राजीव मिश्रा म्हणाले की, साखरेच्या गोदामांमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरण्याची ही पहिलीच घटना आहे. लोकांनी ड्रेनेजवर अतिक्रमणे करून त्यावर बांधकामे केली आहेत. त्यामुळे ड्रेनेजला अडथळा निर्माण झाला आहे. शटर खालून पाणी गोदामांमध्ये शिरले. मजूर आणि जेसीबीच्या मदतीने पाणी बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत साखरेचे बरेच नुकसान झाले होते. प्रशासनाने ड्रेनेजवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवले तर समस्या सुटू शकते.