अंबाला : गेल्या काही महिन्यांत हवामान बदलातील विविध प्रकार पाहायला मिळाले. त्यामुळे गव्हाच्या पक्व होण्याच्या कालावधीपासून कापणी आणि मंडईत पोहोचविण्यापर्यंत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा विषय होता. मात्र, हंगाम संपता संपता शेतकऱ्यांच्या जीवनात गव्हाने आनंद पेरला आहे. अधिकृतरित्या १५ मेपर्यंत गहू खरेदीचा कालावधी आहे. यंदा गव्हाच्या हंगामात याच्याशी संबंधीत सर्व घटकांना दिलासा मिळाला आहे.
दैनिक ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सुरुवातीला गव्हाचे उत्पादन कमी होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, यंदा गव्हाच्या सरासरी उत्पादनात वाढ झाल्याचे आवकेतून दिसून आले आहे. अंबालातील सर्व मंडयांमध्ये व खरेद्री केंद्रावर एक एप्रिल ते १३ मे अखेर २२.६५ लाख क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत ही आवक १७ लाख क्विंटल झाली होती. तर त्याआधीच्या वर्षात ३३ लाख क्विंटल आवक झाली होती. अंबाला शहरातील मंडईत ५.५५ लाख क्विंटल गहू आला आहे. अंबाला छावणीत १.२० लाख क्विंटल गहू आला असून उर्वरीत गव्हाची नोंद बराडा, मुलाना, नन्योला, नारायणगढ आणि शहजादपूर मंडईत झाली आहे. आवक चांगली असली तरी खरेदी प्रक्रियेत काही अडचणी असल्याचे मार्केट कमिटीचे व्हाइस चेअरमन भारत भूषण अग्रवाल यांनी सांगितले.