देशातील अनेक राज्यांत आज बरसणार जोरदार पाऊस, आयएमडीचे अनुमान
यावर्षी मान्सून सामान्य राहण्याच्या पुर्वानुमानादरम्यान शुक्रवारी रात्री देशाच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोसळला. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, सात जुलै रोजी दक्षिण कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यात २३ सेमी पाऊस नोंदवला गेला आहे. उडूपीसारख्या कर्नाटक किनारपट्टीवरील जिल्ह्यात १८ सेमी आणि उप्पिनंगडी येथे १७ सेमी पाऊस झाला आहे.
अमर उजालामधील वृत्तानुसार, तामीळनाडूत १४ सेमी पावसासह नीलगिरी क्षेत्रात हिमस्खलन झाले. राज्यात इतर ठिकाणीही जोरदार पाऊस कोसळला. काईंबतूर, हॅरिसन मलयालम लिमिटेड आणि नीलगिरी क्षेत्रातील वर्थ इस्टेटचा यात समावेश आहे. केरळमध्ये पुढील चार ते पाच दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकण, गोवा, रत्नागिरी जिल्ह्यात १४ सेमी आणि रायगडमध्ये १३ सेमी पावसाची नोंद झाली.
आयएमडीने पुढील चार ते पाच दिवसांमध्ये केरळच्या मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर भारतात जोरदार पाऊस या कालावधीत कोसळेल असे आयएमडीने म्हटले आहे. जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये आठ ते नऊ जुलै या काळात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.