आंध्र प्रदेशात मुसळधार पावसामुळे हाहाकार, १७ जणांचा मृत्यू, १०० बेपत्ता

आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार आतापर्यंत किमान १७ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. अनंतपूर जिल्ह्यातील कादिरी विभागात रात्री उशिरा तीन मजली इमारत कोसळून तीन मुलांसह एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. येथे बचावकार्य सुरू असून आणखी ४ जण इमारतीखाली अडकले असण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील चार जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. रायलसीमाचे तीन जिल्हे आणि दक्षिण किनारपट्टीवरील एका जिल्ह्यात २० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सतत मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आंध्र प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्टची एक बस रामपुरम येथे पुरात अडकली. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील काही भागात झालेल्या जोरदार पावसामुळे निर्माण झालेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरात किमान तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here